Raajoo Lakshman Thokal <https://www.facebook.com/rajuthokal9>  : 

'स्व'चा शोध हि आदिवासींसाठी काळाची गरज 

सह्याद्री आणि सातपुडा पर्वतराजीत हिंडत असताना आदिवासी जीवन अगदी जवळून 
जगण्याचा प्रसंग अनेकवेळा आला. तसा एका आदिवासी कुटुंबात जन्माला 
आलो....आश्रमशाळेत शिकलो...इथेच मोठा झालो....शिक्षणाचा पाढा पूर्णपणे 
वसतिगृहात पूर्ण केल्याने संगत होती ती सर्व आदिवासी मित्रांची.....नाही यात 
मी सर्वांशी मैत्रीचे नाते जपून होतो. आज एका आश्रमशाळेत मास्तरकी करत असताना 
आदिवासी समाजाच्या समस्या अगदी जवळून अनुभवण्याचा प्रसंग नित्याचाच झाला आहे. 
त्यात अनेक प्रसंग धक्का देणारे आहेत. माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसणार 
नाही असेच काही धक्के आहेत. जीवनातील आनंदाच्या सर्वोच्च क्षणी या विचारांना 
जवळही फिरकू द्यायचे नाही असा अनेकवेळा विचार केला परंतु रक्तात असे काही गुण 
आहेत कि ते मला एका ठिकाणी पाय रोवून ठेवू शकत नाहीत. नुकताच मी जव्हारचा 
परिसर आणि तेथील आदिवासी संस्कृती अनुभवत असताना डोक्यावर लाकडाच्या मोळ्या 
घेवून धावतच आपल्या घराकडे येणा-या काही स्त्रिया दिसल्या आणि मग माझ्या मनात 
विचारांचे जणू थैमान सुरु झाले....ते आज येथे आग ओकल्यागत बाहेर पडत आहे. एक 
आदिवासी म्हणून मी कोण ? आपली भाषा कोणती? ती प्रमाणभाषेपेक्षा निराळी कशी ? 
आपले देव निराळे कसे ? ते निसर्गाची प्रतीके का बनली आहेत? आपल्या चालीरीती 
आपले वेगळेपण का जपत आहेत? रीतीवाजाच्या बाबतीत आपण भिन्न का? सण, उत्सव, 
धार्मिक विधी, गाणी, जत्रा, निवद, नारळ, नाच, कपडे, दागिने, बोलण्याची पद्धत 
असे सगळेच सर्वांपासून निराळे का? आपणच असे जंगली, असहाय, हतबल आयुष्य का जगत 
आहोत? हे पशुंपेक्षाही हीन जगणं आपल्या आदिवासी बांधवांच्याच वाट्याला का आले 
आहे? स्वातंत्र्यानंतर म्हणे शिक्षणाची आणि विकासाची गंगा आमच्या दारात 
पोहचविण्याचे काम सरकारने केले....मग अजूनही आम्ही हीन...दीन असेच का? मग तो 
जव्हार असो वा असो चंद्रपूर....गडचिरोली असो वा असो नाशकाचा काही 
भाग....आमच्यामध्ये "स्व"हित जपण्याचा स्वाभिमान का दिसत नाही? आम्हीसुद्धा 
शिकलो....आश्रमशाळा यात फार पूर्वीपासून पुढाकार घेत आहेत.....आमच्यातही 
चांगले अधिकारी आहेत....सर्वोच्च पदावर विराजमान होणारे खेळाडू आहेत....असे 
असूनही आजही आमच्या माता-भगिनी अशा डोक्यावर लाकडाच्या मोळ्या किंवा पाण्याचे 
हांडे घेवून आजही का पळत आहेत. आज आमचे रस्ते शहरात पोहचले....शहरातले रस्तेही 
काही प्रमाणात आमच्यापर्यंत पोहचले...मग का नाही शहरातला थोडा फार विकास 
आमच्या गावाला आला काही काळ.....आज विजेचे पोल पोहचले....काही गावांना 
वीजबिलेही आलीत....पण ती वीज कुठं हाय हे आम्हाला अजूनही शोधावं लागत 
आहे....अरे हे आम्हालाच का? जव्हारला आलो होतो तो जव्हार संस्थानचा गौरवशाली 
इतिहास मनात साठवायला....तो स्वाभिमान जागवायला...पण इथे तर आज वेगळेच चित्र 
मला दिसले....कोणी केला आपला आदिवासी समाज असा लाचार...गांडूळाचा. कुणी कापली 
आपली नाळ....प्रगतीची ??? हे चित्र असेच राहिले तर कुठे जाणार आहोत आपण? काय 
आहे आपल्या भविष्यात वाढून ठेवलेले ? का धरणासाठी आमच्याच जमिनी लागतात? का 
जगाच्या कल्याणासाठी आमचाच बळी दिला जातो? हक्काच्या जमिनींसाठी तुरुंग आणि 
लाचारीचे जिने का जगतोय माझा समाज? खरच मित्रांनो चंद्रपूर ते जव्हार असा या 
वर्षीचा एकंदरीत प्रवास करत असताना मी खूपच बेचैन आहे. आपण सारी जंगलाचे राजे 
आज भूतांगत अवस्था आपली झाली आहे. रानटी लोक, अडाणी, पशुतुल्य असे म्हणून 
कदाचित आपणास काही हिणवत असतील. पण आपलेच जेव्हा मोठ्या पदावर आणि गादीवर 
बसतात, तेव्हा जागवतात का हा सामाजिक स्वाभिमान ? ब-याच वेळा आपलेच धोका देतात 
याचे जास्त दुख मनाला पचवावे लागते. डोंगरद-यातला विजनवास हा काही दैवनिर्मित 
नाही, नशिबाचे देणेही नाही. आपण याचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. 
चिंतन करणे आवश्यक आहे. हे सारे आपल्याच पाचवीला का पूजले आहे, सातवी नेमकी 
आपल्याच गावात का येते, तिचा बंदोबस्त का होत नाही? कुणी केला आपल्या 
स्वाभिमानाचा पराभव? कुणी लुटली आपली राज्ये? आपण काही जंगलातील श्वापदे 
नाहीत. आपल्यालाही डोके आहे. बुद्धी आहे. आपणही देशाची घटना शिरसावंद्य मानतो. 
तिच्यातून होणारा विकास मान्य केला आहे. सार्वभौम सत्ता लोकांच्या हाती हा 
आपलाही मंत्र आहे आणि यातूनच ज्ञानाची लालसा धरली पाहिजे. वेद, उपनिषदे, 
शास्त्रे, पुराणे धुंडाळली पाहिजेत. समाजाच्या भावना, विचार, कल्पना, देव, 
धर्म, देवळे, तीर्थे, भक्ती, ग्रंथ, उपासना, सणवार, कुळकुळाचार, चालीरीती, 
उत्सव इत्यादींचा अभ्यास केला पाहिजे. हे सारे अंधश्रद्धांचे गौडबंगाल कोणत्या 
विचारावर आधारलेले आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. त्याशिवाय 'स्व'चा शोध लागणे 
अवघड आहे. आज आपल्या पुढे प्रश्न तोच आहे. आपली संस्कृती, चालीरीती, भाषा, 
धर्म, इतिहास याचा शोध घेणे...तो सर्व आदिवासींपर्यंत पोहोचविणे....त्याची 
जपवणूक करणे....नाही तर आम्ही असे का या प्रश्नाचे उत्तर आपल्या हजारो 
पिढ्यांना मिळणार नाही. म्हणून प्रत्येकाने आपल्या क्षेत्रात राहून आपल्या 
समाजासाठी मोलाचे योगदान देणे हि प्रत्येक आदिवासीने जबाबदारी स्वीकारणे 
गरजेचे आहे.

-- 
-----------------------------------------------------------------------
Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,20,000 minutes): 
http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1 

Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/26e839cb-09ba-49b3-898e-f153b026ef59%40googlegroups.com.

Reply via email to